तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील जातेगाव बुदुक येथे बैलगाडा शर्यतीचा सराव करताना छकडी गाड्यासह विहिरीत पडून दोन बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. ३) घडली आहे. जातेगाव बुद्रुक येथील गाडाप्रेमी शुभम उमाप हा घराजवळील मोकळ्या जागेमध्ये बैलगाडा शर्यतीच्या बैलांचा छकडी गाड्याला सराव घेत होता.
त्यावेळी बिथरल्याने बैल जोरात पळाले. वेग जास्त असल्याने ते छकडी गाड्यासह विहिरीत पडले. यावेळी राहुल पवार, अविनाश उमाप, अजित पवार, गौतम उमाप, संभाजी उमाप, निखील इंगवले, अशोक उमाप, सुजित उमाप, अंतेश्वर यादव आदी युवकांनी विहिरीमध्ये उड्या मारत बैलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्यात बुडाल्याने बैलांचा मृत्यू झाला. नागरिकांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही मृत बैलांना पाण्यातून बाहेर काढले.