पुणे : आपल्या मित्राची सिक्युरिटीच्या टेबलमध्ये विसरलेली चावी घेऊन त्याद्वारे घराचा दरवाजा उघडून कपाटातील साडेपाच लाख रुपयांचे दागिने मित्रानेच चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी मित्राला अटक केली आहे. राहुल सुभाष राठोड (वय ३०, रा. वडजाई, वाघोली) असे या चोरट्याचे नाव आहे. ही घटना १० ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजून ४७ मिनिटे ते ११ वाजून १० मिनिटे या दरम्यान घडली आहे. याबाबत प्रसाद फक्कड चेडे (वय २८, रा. साई मंगल अपार्टमेंट, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद चेडे व आरोपी राहुल राठोड हे दोघे मित्र आहेत. फिर्यादी यांनी सिक्युरिटीचे टेबलमध्ये घराची चावी ठेवली होती. ती परत घेण्यास ते विसरुन गेले. त्यानंतर ते घरी आले. तेव्हा घराच्या कपाटातील सुटकेसमध्ये असलेल्या स्टिलच्या डब्यामध्ये ठेवलेले फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीचे ५ लाख ३० हजार रुपयांचे ६ तोळे वजनाचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दिली होती.
सहायक पोलीस निरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर, दीपक कोकरे, प्रितम वाघ, विशाल गायकवाड यांनी सीसी टीव्हीचे फुटेज तपासले असता त्यामध्ये राहुल राठोड हा त्या दिवशी आलेला व त्याने सिक्युरिटी गार्डच्या वहीत नोंद करुन चावी घेऊन वर गेल्याचे दिसले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून साडेपाच लाखांच्या दागिन्यांपैकी ३ लाख ३८ हजार रुपयांचे ४३ ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.