लोणी काळभोर : दिवाळी सणानिमित्त घर बंद करून मूळ गावी गेलेल्या दोन नागरिकांच्या घरांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सिद्राम मळा परिसरातील राजनंदिनी पार्क मध्ये सोमवारी (ता. 4) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी रोख रकमेसह चालू बाजार भावाप्रमाणे सुमारे 5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
पोपट भगवान चव्हाण (वय 46, राजनंदिनी पार्क सिद्राम मळा लोणीकाळभीर ता. हवेली, मु रा. निमसाखर, ता. बारामती) व सुरज रामचंद्र आगरकर (रा. लोणी काळभोर) यांच्या घरी चोरी झाली आहे. तर याप्रकरणी पोपट चव्हाण यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपट चव्हाण हे एक नोकरदार असून लोणी काळभोर येथील राजनंदिनी पार्क येथे कुटुंबासोबत राहतात. दीपावलीच्या सणानिमित्त सुट्टी मिळाल्याने चव्हाण हे कुटुंबासोबत मूळ गावी गेले होते. दरम्यान, रविवारी (ता.3) रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून घरामध्ये प्रवेश केला. आणि बेडरूम मधील कपाटातील 10 हजार रुपयांची रोकड व चालू बाजार भावाप्रमाणे 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याची अंगठी व मंगळसूत्र (1 तोळा) असा 85 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
दुसऱ्या घटनेत, सुरज आगरकर यांच्या घरातून चोरट्यांनी 35 हजार रुपयांची रोकड व 3 तोळ्याचे गंठन, 2 तोळ्याचे कानातील फुले सध्याच्या बाजार भावाप्रमाणे अंदाजे 3 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या दोन्ही घरफोडीत चोरट्यांनी सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहेत.