पुणे : ज्येष्ठ साहित्यिक,प्रसिद्ध समीक्षक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (वय 75) यांचे दीर्घ आजाराने बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, कन्या, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
१४ नोव्हेंबर रोजी कोत्तापल्ले यांना विषाणू संसर्गाचे निदान झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. दोन दिवसांपासून ते अत्यवस्थ होते. अखेरीस बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. कोत्तापल्ले यांचा जन्म 6 मार्च 1948 रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला. मराठी साहित्यात पीएचडी प्राप्त केल्यानंतर ते औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात अध्यापन करू लागले. पुढे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. प्रदीर्घ कारकिर्दीत डॉ. कोत्तापल्ले यांनी अनेक शैक्षणिक तसेच साहित्यिक संस्थांचे पदाधिकारी म्हणून काम केले.
कथा, लघुकथा, कविता, कादंबरी, अनुवाद तसेच समीक्षा व संपादन अशी बहुआयामी साहित्यिक कारकीर्द, हे डॉ. कोत्तापल्ले यांचे वैशिष्ट्य होते. चिपळूण येथे झालेल्या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या मराठी भाषा सल्लागार समितीचेही ते अध्यक्ष होते. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना राज्य शासनाचे पुरस्कार लाभले होते.
डाॅ. कोत्तापल्ले यांची साहित्यसंपदा
समीक्षा – पापुद्रे, ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध, नवकथाकार शंकर पाटील, साहित्य अन्वयार्थ, मराठी कविता : एक दृष्टीक्षेप, साहित्याचा अवकाश
कथासंग्रह – कर्फ्यू आणि इतर कथा, संदर्भ, राजधानी, रेखा आणि पाऊस, कवीची गोष्ट, देवाचे डोळे, सावित्रीचा निर्णय
कादंबरी – मध्यरात्र, गांधारीचे डोळे, पराभव
इतर लेखन – गावात फुलले चांदणे, मराठी साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक संघर्ष, उद्याच्या सुंदर दिवसासाठी, ज्योतिपर्व (ज्योतिराव फुले यांचे चरित्र), कोमेजलेला चंद्र (उडिया अनुवाद)
राज्य शासनाचे पुरस्कार – मूड्स (कवितासंग्रह), संदर्भ, गांधारीचे डोळे, ग्रामीण साहित्य, उद्याच्या सुंदर दिवसासाठी, केशवराव विचारे पारितोषिक, बी. रघुनाथ पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, परिमल पुरस्कार, गिरीष गांधी साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार.