पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हत्तीच्या केसांचे दागिने बनवून त्याची विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका सराफ व्यावसायिकावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्ही. आर. घोडके सराफ, बिझी लॅन्ड इमारत, कुमठेकर रोड असे गुन्हा दाखल झालेल्या सराफाचे नाव आहे. याबाबत मानक वन्य जीव रक्षक आदित्य विवेक परांजपे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अंगठी किंवा ब्रेसलेटमध्ये हत्तीचे केस हत्तीचे शौर्य आणि सामर्थ्य दर्शवतात. काळ्या रंगाचा असल्याने तो वाईट नजरेपासून दूर ठेवतो. त्यामुळे ज्या मुलांना वारंवार भयानक स्वप्न पडतात, तसेच जे इतरांच्या वाईट कंपने प्रभावित होतात त्यांच्यासाठी हे सुचवले आहे. असं असले तरी वन्य जीव संरक्षण कायद्यान्वये हत्तीच्या केसांची विक्री करणे अथवा जवळ बाळगण्यास बंदी आहे.
याबाबत मानक वन्य जीव संरक्षक आदित्य विवेक परांजपे यांनी सांगितले की, घोडके सराफ यांची रेडिओवर जाहिरात ऐकली होती. तसेच त्यांची इंटरनेटवर हत्तीच्या केसापासून बनविलेले दागिने अशी जाहिरात पाहण्यात आली. आम्ही एकाला ग्राहक म्हणून त्यांच्याकडे पाठविले. त्याने हत्तीचा केस असलेली चांदीची अंगठी खरेदी केली. ती तपासून पाहिल्यावर त्यात खरोखरच हत्तीचा केस आढळून आला.
त्यानंतर आम्ही पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार व गुन्हे निरीक्षक घोडके यांची भेट घेऊन त्यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून हत्तीचा केस हस्तगत केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फरताडे करत आहेत.