बारामती : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत होत आहे. बारामतीचा गड राखण्यासाठी शरद पवार यांचा आज, मंगळवारी (दि. 05 नोव्हेंबर) रोजी बारामतीत एकूण सहा सभा होणार आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून ते बारामतीकरांसोबत संवाद साधणार आहेत.
बारामती हे पवार कुटुंबियांमुळे देशात अन् राज्यात चर्चेत असलेले शहर ठरले आहे. बारामतीचे राजकारण पवार कुटुंबियांभोवती फिरत असते. अशातच युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवार हे देखील मैदानात उतरले असून ते आज बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात चार तर शहरात दोन ठिकाणी सभा घेणार आहेत. त्यामुळे अजित पवारांसाठी यंदाची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक ठरणार असल्याचं दिसत आहे.
अशातच युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवार हे देखील मैदानात उतरले असून ते आज बारामतीत 6 सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांना ‘स्वाभिमानी सभा’ असे नाव देण्यात आले आहे. यातील चार सभा ग्रामीण भागात तर दोन सभा बारामती शहरात होणार आहेत. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ, सुपा येथील बसस्थानकाजवळ, श्री क्षेत्र मोरगाव येथील हॉटेल शिवतारा येथे, सोमेश्वरनगर करंजे येथे कारखाना रस्ता परिसरात शरद पवार यांच्या जाहीर सभा होणार आहेत. त्यामुळे शरद पवार या सभांच्या माध्यमातून काय बोलणार, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वात चर्चेतील लढत पुन्हा बारामती विधानसभा ठरणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील बारामती मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेमध्ये कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.