छत्रपती संभाजीनगर : प्रेयसीसोबत पळून जाण्यासाठी मित्राची निघृण हत्या करून स्वतःच्या खुनाचा बनाव केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना १ नोव्हेंबर रोजी सकाळी गंगापूर भागातील सारंगपूर शिवारात घडली आहे. खून केल्यानंतर मृतदेहाला आरोपीने स्वतःचे कपडे घालून तो जाळण्याचा प्रयत्न करून आधार कार्ड, मोबाईल तेथेच टाकला. त्यामुळे पोलिसदेखील चक्रावून गेले होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने हा बनाव उघड केला आहे.
अमोल शिवनाथ उघडे (१७, रा. कदीम शहापूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर महेश रमेश माठे (२०. रा. बझर, ता. गंगापूर) आणि किशोर रमेश बर्डे (२३, रा. जुने वझर, ता. गंगापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर पोलिसांना अनोळखी मृतदेह आढळून आल्याची माहिती १ नोव्हेंबर रोजी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. तेव्हा तिथे महेश माठे याचे आधार कार्ड आणि मोबाईल आढळून आला. त्यावरून तो मृतदेह हा महेशचा असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. त्याच्या घरच्यांना बोलावले. तेव्हा त्यांनी कपडे, आधारकार्ड महेशचे आहे. मात्र त्याच्या पायावर जन्मखूण नसल्याने तो महेश नाही असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता अमोलदेखील बेपत्ता असल्याचे समोर आले. अमोलच्या घरच्यांनी तो अमोलच असल्याचे स्पष्ट केले.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती देत महेशचा शोध सुरू केला. घटनास्थळी तीन ग्लास आणि चमचे मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. दरम्यान, महेशला बारामती येथून तर किशोरला त्याच्या गावातून पोलिसांनी अटक केली. स्वतः च्या खून झाल्याचे समजल्यानंतर तरी आपल्याला आणि प्रेयसीला कोणी शोधणार नाही यासाठी अमोलचे मित्र किशोरच्या मदतीने हत्या केल्याची महेशने कबुली दिली.
दरम्यान, अमोलचा खून केल्यानंतर किशोरने त्याच रात्री महेशला संभाजीनगरच्या रेल्वेस्टेशनवर सोडून स्वतःच्या गावाकडे परत गेला. महेश रेल्वेने परभणी आणि तेथून दोन दिवस फिरत राहिला. त्याच दरम्यान त्याने प्रेयसीला देखील बोलावून सोबत घेतले होते. मात्र, तांत्रिक तपास करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारामतीच्या बसस्थानकावर महेशला अटक केली.
म्हणून रचला स्वतःच्या खुनाचा बनाव
आरोपी महेश माठे याचे शेजारच्या गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिच्या घरच्यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे महेशने स्वतःच्या खुनाचा बनाव करण्याचा प्लॅन आखला. त्याचा साथीदार किशोर बर्डे याला त्याने सोबत घेतले. त्यानंतर अमोल उघडे याला दारू पिण्यासाठी सारंगपूर शिवारात घेऊन गेले. तिथे तिघांनी बसून सोबत दारू पिली. त्यानंतर आरोपी महेश आणि किशोरने अमोलचा गळा आवळून खून केला.
महेशचे कपडे अमोलच्या मृतदेहाला घातले
महेश याचे कपडे अमोलच्या मृतदेहाला घातले. शरीरावरील जन्मखुणा नष्ट करून तो महेशचा आहे हे सिद्ध करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. तोंडावर रुमाल टाकून जाळले. तसेच पायावर, हातावर आणि अन्य भागातील अवयवावर जाळण्यात आल्याच्या खुणा आहेत. त्यानंतर महेश याने स्वतःचे पाकीट आधार कार्ड, पॅनकार्ड आणि मोबाईल अमोलच्या मृतदेहाच्या बाजूला सोडून तेथून महेश आणि किशोर पसार झाले.