पिंपरी चिंचवड : दिवाळीनिमित्त रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या 35 वर्षीय व्यक्तीला भरधाव कारने धडक दिल्याची घटना घडली होती. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर पसार झालेल्या आरोपी मोटारचालकाला सोमवारी पोलिसांनी अटक केली. ही घटना रावेत येथील फॅलेसिटी सोसायटीसमोर शुक्रवारी (दि. 01 नोव्हेंबर) रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे.
सोहम पटेल (वय 38, रा. फॅलेसिटी सोसायटी, रावेत) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी वैदेही पटेल (वय 38) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आदित्य चंद्रकांत भोंडवे (वय- 23, रा. संस्कृती हाईटस, शिंदे वस्ती, रावेत) असे ताब्यात घेतलेल्या मोटारचालकाचे नाव आहे.
अपघातानंतर कारचालक आदित्य भोंडवे हा घटनास्थळी न थांबता मोटारीसह पसार झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रावेत पोलिसांनी परिसरातील 80 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करून आरोपीचा शोध लावला आणि सोमवारी (दि.04) त्याला अटक केली.
नेमकं काय घडलं?
दिवाळीनिमित्त सोहम पटेल हा तरुण आपल्या कुटुंबीयांसोबत फटाके उडवीत असताना एका भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी वाहन चालकाने त्याला चिरडले. अपघात एवढा भीषण होता की सोहम अक्षरश: उडून रस्त्याच्या बाजूला जाऊन पडले. अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. स्थानिकांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. तसेच, सोहम यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्देवी अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. ऐन दिवाळीच्या दिवशी पटेल कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.