पुणे : पुणे आणि आसपासच्या भागात थंडीला सुरुवात झाली असून, रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. सोमवारी (दि. ४) शिवाजीनगरमध्ये १७.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, आकाश निरभ्र राहणार असून सकाळी धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शहरात किमान व कमाल तापमानात चढउतार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी घटलेल्या तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता.
तसेच रात्रीच्या तापमानातही वाढ झाली होती. सध्या आकाश निरभ्र झाले असून सूर्याच्या दक्षिणायनास सुरुवात झाली आहे. तसेच शहराच्या दिशेने थंड वारे वाहू लागले आहेत. तसेच पहाटे धुकेही पडत आहे. एनडीए येथे १६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले आहे. दुपारच्या तापमानात घट झाली असून, ३४ अंशांवर गेलेले तापमान सोमवारी ३१.६ अंशांवर आले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे. येत्या २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे.
अनेक भागात गारठा वाढला
काही भागात दुपारी उन्हाचा चटका कायम असून रात्री गारठा जाणवू लागला आहे. सोमवारी सर्वात कमी तापमान जळगाव येथे १६.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान, राज्यात हवामान कोरडे राहणार असून तापमानात घट होणार आहे. उत्तर भारतात थंडीची चाहूल लागली आहे.
राज्यातील हवामान कोरडे झाले आहे. त्यामुळे राज्यातून पाऊस गायब झाला आहे. मागील चार दिवस पावसाची नोंद झाली नाही. राज्यातील अनेक भागांत किमान आणि कमाल तापमानात घट झाली. मात्र काही भागांत दुपारी उन्हाचा चटका कायम दिसतो. तर सकाळी हवेत गारठा जाणवत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक शहरांचे तापमान उतरले आहे. राज्यात सोमवारी सर्वात जास्त तापमान अलिबाग येथे ३५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.