नवीन पनवेल: ब्लॉक ट्रेडिंगमध्ये मार्केटपेक्षा २० ते ३० टक्के कमी दराने स्टॉक ट्रेडिंग करून मिळेल, असे खोटे सांगून ४७ लाख ८७ हजार १०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पारथा मुखर्जी हे खारघर येथे राहत असून त्यांना शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन ट्रेडिंग करायची सवय आहे. त्यांना फेसबुक अकाऊंटवर एका कंपनीच्या नावाचे पेज दिसले. त्यावेळी ब्लॉक ट्रेडिंगमध्ये मार्केट पेक्षा २० ते ३० टक्के कमी दराने स्टॉक ट्रेडिंग करून मिळेल, असे नमूद केले होते.
त्या पेजवर क्लिक केले असता व्हॉट्सअॅप ग्रुप ओपन झाला. त्यानंतर ग्रुपवर चॅटिंग सुरू झाले, ट्रेडिंग कशी करायची यावर माहिती घ्या, असे सांगण्यात आले. त्यानंतर व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन, त्याचा असिस्टंट, कस्टमर सर्व्हिस धारक आणि कंपनीचे हेड समिक दास शर्मा यांनी संगनमत करून मुखर्जी यांना आयपीओ ट्रेडिंगच्या गुंतवणुकीवर रजिस्ट्रेशन नंतर ओपन झालेल्या पेजवर वाढीव रक्कम जमा झाल्याचे भासवले. तसेच वेगवेगळ्या बँक खात्यांची माहिती पाठवून त्यावर ४७ लाख ८७ हजार १०० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानुसार मुखर्जी यांनी ही रक्कम ट्रान्सफर केली.