राहुलकुमार अवचट / यवत : दौंड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून वीरधवल जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वीरधवल जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे दौंडमध्ये महायुती भक्कम स्थितीत निवडणुकीला सामोरे जाऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वीरधवल जगदाळे यांनी माघार घेतल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल यांनी अजित पवार आणि महायुतीतील सर्वच प्रमुख नेत्यांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. दौंडमध्ये वीरधवल जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीमध्ये आता अधिक भक्कमपणा येणार असून आम्ही या निवडणुकीला ताकतीने सामोरे जाऊ आणि विजय हा आमचा निश्चित असेल, असे राहुल कुल यावेळी म्हणाले. वीरधवल जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राहुल कुल यांनी महायुती मधील सर्वच वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त केले.