मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून प्रचारालाही सुरवात झाली आहे. महाविकास आघाडीसोबतच महायुतीचे नेते सुद्धा जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला येथील सभेतून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात केली आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता खात्यात कधी जमा होणार याची माहिती दिली. याबरोबरच मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहिणीसह सरकारच्या इतर योजना विरोधी पक्ष बंद करण्याच्या बाता करत असल्याची टीकाही केली.
पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आम्हाला लाडक्या बहिणीला सुरक्षित करायचं आहे. लाडकी आणि सुरक्षित बहिण देण्याचं काम आमचं आहे. 1500, 2000 नाही तर लाडक्या बहिणीला राज्यात लखपती होताना आम्हाला पाहायचं आहे. 20 तारखेला निवडणूक संपताच डिसेंबरचे पैसे जमा होणार अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली.
विरोधी पक्ष म्हणतात लाडकी बहिण योजना बंद करु. तुम्ही त्यांना काय उत्तर देणार ते नागपूर खंडपीठात गेले. मुंबई हायकोर्टात गेले पण त्यांची ही योजना बंद करण्याची त्यांची याचिका फेटाळण्यात आली. ते म्हणतात की लाडकी बहीण योजनेद्वारे पैसे देणे गुन्हा आहे, पण जर हा गुन्हा असेल तर मी एकदा नाही तर दहा वेळा असा गुन्हा करायला तयार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.