मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षातील बंडखोरांना कसे शांत करायचे, यासाठी वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. मतांचे विभाजन होऊ नये यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांकडून नराज नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. असे असतानाच आता मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली असून काही मतदारसंघांत निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी मतदारसंघांची नावंदेखील सांगितली आहेत.
मनोज जरांगे यांनी दसरा मेळावा घेत त्यावेळी त्यांची राजकीय भूमिका मंडळी होती. राज्यातील काही निवडक मतदारसंघांत उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मनोज जरांगे यांनी जिथे आपली ताकद आहे, तसेच अन्य पक्षांचे, गटांचे समर्थन मिळणे ज्या भागात शक्य आहे. तेथे निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. एससी, एसटी या आरक्षित जागांवर ते उमेदवार उभे करणार नाहीत. सोबतच ज्या जागांवर आपली ताकद नाही, त्या ठिकाणी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडायचं, असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यानंतर आज जरांगे यांनी निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघांची घोषणा केली आहे.
मनोज जरांगे हे मराठवाड्यातील अनेक जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मराठवाड्यातील मतदारसंघ निवडले असून यामध्ये बीड, फुलंब्री, परतूर, पाथरी या मतदारसंघांचा समावेश आहे.
‘या’ जागांवर निवडणूक लढवणार मनोज जरांगे..
1) केज,(राखीव )(बीड जिल्हा)
2)बीड, (बीड जिल्हा)
3) फुलंब्री, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)
4) परतूर, (जालना जिल्हा)
5) हिंगोली, (हिंगोली जिल्हा)
6) पाथरी,(परभणी जिल्हा)
7) हदगाव, (जिल्हा नांदेड)
कोणकोणत्या मतदारसंघांत उमेदवार पडणार?
1) भोकरदन, (जालना जिल्हा)
2) गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर)
3) कळमनुरी, (हिंगोली जिल्हा)
4) गंगाखेड, (परभणी जिल्हा)
5) जिंतूर, (परभणी जिल्हा)
6) औसा-(लातूर जिल्हा)
कोणत्या मतदारसंघात देणार पाठिंबा?
1) पश्चिम विधानसभा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर
2) बदनापूर राखीव जालना जिल्हा