मुंबई : ऐन दिवाळीच्या दिवसात टीम इंडियाच्या पदरी लाजिरवाणा पराभव पडला आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना पार पडला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. न्यूझीलंडने मुंबई कसोटीत भारताचा 25 धावांनी पराभव करून मालिका 3-0 ने खिशात टाकली.
न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 147 धावांच लक्ष दिल होतं. मात्र त्यांना केवळ 121 धावाच करता आल्या. न्यूझीलंड संघाने मालिकेत सलग तिसरा विजय मिळवला. एजाज पटेल न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तिसऱ्या कसोटीत त्याने एकूण 11 विकेट घेतल्या.
याआधी भारतीय कसोटीच्या इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं की एखादा संघ भारतात आला आणि भारताविरुद्ध जिंकला. संघाविरुद्ध 3 किंवा अधिक सामन्यांची कसोटी मालिका कोणीच जिंकली नाही. मात्र,न्यूझीलंडने इतिहास रचत मालिका 3-0 ने जिंकली आहे.
न्यूझीलंडकडून दुसऱ्यांदा सर्वात कमी स्कोअर डिफेंड करण्यात आला आहे. यापूर्वी न्यूझीलंडने 46 वर्षांपूर्वी 1978 मध्ये इंग्लंडविरुद्ध 137 धावा डिफेंड केल्या होत्या. इतकंच काय तर भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमध्ये 92 वर्षातील सर्वात मोठा पराभव ठरला आहे. कसोटीत भारताला तीन पेक्षा जास्त सामन्यात क्लिन स्वीप करणारा न्यूझीलंड हा पहिला संघ ठरला आहे. या पराभवासह भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित बिघडलं आहे. आता भारताला काहीही करून उर्वरित 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तसेच भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पहिलं स्थानही गमावलं आहे.