राहुरी : राहुरी तालुक्यात मुळानदीच्या पुलावरून पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना तांदुळवाडी शिवारात शनिवारी (दि. २) दुपारच्या सुमारास घडली आहे. बाळू रामनाथ जाधव (वय-३५ वर्षे) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू जाधव हा तरुण गेल्या दोन वर्षांपासून राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील एका शेतकऱ्याकडे शेतमजूर म्हणून काम करत होता. जाधव हा त्याच्या कुंटूबासह राहत होता. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बाळू जाधव पोहण्यासाठी तांदुळवाडी शिवारातील मुळानदीवरील पुलावरुन नदीपात्रात उडी मारली. थोडावेळ त्याने पोहण्याचा आनंद लूटला. मात्र त्याचा दम तूटल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्यावेळी त्याच्या बरोबर असलेला त्याचा मेव्हणा व भावजयने त्याला वाचवीण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पाण्यात बुडाला आणि दिसेनासा झाला.
दरम्यान, काही तरुणांनी बाळू जाधव याचा पाण्यात शोध घेतला. मात्र, त्याचा शोध लागला नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते, पोलिस नाईक गोवर्धन कदम, अंकुश भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी उशिरापर्यंत बाळू जाधव या तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरु होते.