उरुळी कांचन : दिवाळीत काही मुले रस्त्यावर फटाके वाजवत होते. फटाक्यांमुळे संपूर्ण रस्त्यावर धूर झाल्याने दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात चौघेजण जखमी झाले आहेत. तर एकजण गंभीर जखमी झाला असून चौघांवर वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोडवरील जुन्या एचडीएफसी बँकेसमोर सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
चक्रधर संतोष कांचन, क्षितिज राहुल जाधव (वय- 18, रा. दोघेही उरुळी कांचन), सिद्धांत नवनाथ सातव (वय- 20) व प्रतीक संतोष साठे (वय- 20) असे अपघातात जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत. यातील सिद्धांत सातव याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चक्रधर कांचन व त्याचा मित्र क्षितिज जाधव हे दोघेजण बुलेट गाडीवर आश्रम रोडने निघाले होते. तर सिद्धांत सातव व प्रतीक साठे हे दोघेजण इलेक्ट्रिक गाडीवर भवरापूरवरून उरुळी कांचन येथे काही कामानिमित्त निघाले होते. यावेळी आश्रम रोडवर जुन्या ठिकाणी असलेल्या एचडीएफसी बँकेसमोर एका दुकानाचे उद्घाटन सुरू होते. यावेळी त्या ठिकाणी काही नागरिक रस्त्यावर फटाके वाजवत होते. त्यामुळे रस्ता पूर्णपणे हा धुरमय झाला होता. यावेळी अचानक पेटलेला फटाका दुचाकी चालकाला दिसला.
दरम्यान, पेटवलेला फटाका वाचवताना आश्रम रोडने आलेल्या दुचाकीने सोलापूर हायवे कडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता कि, दुचाकीवरील चौघेही उडून बाजूला पडले. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ सिद्धिविनायक रुग्णालयात नागरिकांच्या मदतीने दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून उरुळी कांचन पोलीस नेमके कोणावर कारवाई करणार? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.