पुणे : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत बारामती हा मतदारसंघ सध्या राज्यभरात चर्चेचा विषय आहे. या जागेच्या रुपात अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात थेट लढत होत आहे. अजित पवार सध्या या मतदारसंघाचा दौरा करत आहेत. त्यांनी गावागावात जाऊन थेट मतदारांच्या भेटी-गाठी सुरू केल्या आहेत. अशातच बारामतीमधील अजित पवारांच्या त्या बॅनरची चर्चा सध्या राज्यभर सुरु आहे.
बारामतीमधील अजित पवारांच्या त्या बॅनरवर असा उल्लेख केला आहे की, “आमचं भविष्य ज्योतिषाकडे बघून जाऊन पाहू नका. तर अजित दादांना मत देऊन बघा. अजित दादांच्या भविष्यातील मतदार आम्ही रुईकर.” या बॅनरची सध्या राज्यभर चर्चा आहे. रुई येथील गावभेट दौऱ्यात गावकऱ्यांनी असे बॅनर झळकवल्याने अजित दादांची कळी खुलली गेली आहे. यावेळी अजित दादांनी स्वतः नागरिकांनी धरलेला बॅनर वाचून दाखविला. तेव्हा त्यांच्या चेह-यावर हसू आले.
सध्या राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणे अशी लढत होत असून अजित पवार की युगेंद्र पवार अशी जोरदार चर्चा सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.