अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील दोन भाविकांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऐन पाडव्याचा दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने आश्वी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना शनिवारी (दि. २) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर -मनमाड रोडवर शिंगवे नाईक शिवारात घडली आहे. या अपघातात आश्वी बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य जाखोबा राणुजी पिलगर व प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव मुरलीधर खेमनर यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री. क्षेत्र बाबीर बाबा देवस्थान येथे दर्शनासाठी दोन भाविक दुचाकी वरून जात होते. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर -मनमाड रोडवर शिंगवे नाईक शिवारात समोरुन येत असलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
दरम्यान , कंटेनरच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच दरवर्षी प्रमाणे बाबीर देवस्थान दर्शनाला जाणाऱ्या भाविकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना उपचारासाठी शिंगवे गावातील ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र दोघांचा उपचारापुर्वीच मृत्यु झाला आहे. जाखोबा पिलगर यांच्या पाटीमागे पत्नी, दोन मुल, एक मुलगी, जावई, सुन ,नातवंड असा परिवार आहे. विठ्ठलराव खेमनर यांच्या पाटीमागे पत्नी, दोन मुल, दोन मुली सुना,नातु ,जावई असा परिवार आहे. या अपघाताने आश्वी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.