पुणे : पुण्यातून एकाची फसवणुक केल्याची बातमी समोर आली आहे. कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास अधिक परताव्याचे आमिष दाखवून १ कोटी ९५ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांकडून वरद प्रॉपटीज सोल्युशन कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महेश विजय कुंटे (वय ५१), अपर्णा महेश कुंटे (वय ४८, दोघे रा. कृष्णा रेसिडेन्सी, हॉटेल वाडेश्वर मागे, लॉ कॉलेज रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. याबाबत सदाशिव बाळकृष्ण कुलकर्णी (वय ६४, रा. सन सॅटेलाईट, सनसिटी रोड, वडगाव) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार वरद प्रॉपर्टीज सोल्युशन प्रा. लि. च्या नवले आयटी झोन येथे २०१९ ते २०२४ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरद प्रॉपर्टीज सोल्युशनचे संचालक महेश कुंटे याने फिर्यादी यांना २०१९ मध्ये अधिक परताव्याचे आमिष दाखविले. त्यामुळे फिर्यादी यांनी आतापर्यंत १ कोटी ७६ लाख रुपयांची गुंतवणुक त्यांच्याकडे केली होती. या गुंतवणुकीवर १९ लाख ५२ हजार रुपये देण्याचे वचनपत्रान्वये कबुल केले होते. असे असतानाही कोणताही परतावा न देता त्यांची १ कोटी ९५ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पुढील तपास अर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मगर करीत आहेत.