पुणे: येरवडा परिसरात पार्किंगच्या वादातून गुरुवारी (दि. ३१) रात्री झालेल्या भांडणामध्ये एका निवृत्त लष्करी जवानाने एकावर बंदुकीतून गोळीबार केला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा शुक्रवारी (दि . १) उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपीला गोळीबार प्रकरणी अटक केली होती. आता त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हा प्रकार येरवड्यातील अशोकनगर परिसरातील श्रीराम मित्र मंडळाजवळ घडला. श्रीकांत शामराव पाटील (वय ४५, रा. अशोकनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात दिलशाद शहानवाज मुलाणी (वय ३३, , येरवडा) यांनी येरवडा फिर्याद नोंदवली आहे. घटनेत त्यांचे वडील शहानवाज (वय-५७) गंभीर जखमी झाले.
पाटील हा निवृत्त लष्करी जवान आहे. तो मुलाणी यांच्या शेजारी राहतो. उभय कुटुंबांमध्ये चारचाकी गाडीच्या पार्किंगवरून नेहमी वाद होत असे. त्यांच्यात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास याच कारणावरून खटका उडाला. त्यावेळी पाटील घरातून १२ बोअरची बंदूक घेऊन आला व त्याने बंदुकीतून शहनवाज मुलानी यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यामध्ये ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. मुलाणी कुटुंबीयांनी व स्थानिक रहिवाशांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर येरवडा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाटील याला अटक करून त्याची बंदूक जप्त केली. गारांदर्भात पाटीलविरुद्ध खुनाचा प्रयल केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता त्यामध्ये खुनाचे कलम वाढविण्यात येणार आहे.