नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील धरमपेठ येथे असलेल्या निवासस्थानी शुक्रवारी अचानक सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना याआधीपासूनच झेड दर्जाची सुरक्षा आहे. पण गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या निर्देश आणि सूचनेनुसार गृहमंत्रिपदाचीही जबाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
दिवाळीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नागपूरमध्ये होते. सकाळी ते शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत भाजपच्या बंडखोरांची समजूत घालण्यात व्यस्त होते. त्याचवेळी त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी मात्र अचानकपणे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. यासंदर्भात स्वतः फडणवीस यांना विचारले असता त्यांनी मात्र ही वाव तुम्ही पोलिसांनाच विचारा असे उत्तर दिले.
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस स्वतः नागपुर येथील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्या निवासस्थानी राज्यभरातून भेटणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता ही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक पाळीत २६ याप्रमाणे १२ फोर्स वन कमांडो तैनात करण्यात येणार आहेत. यासोबतच शहर पोलिसांचे स्थानिक पथक आधीपासूनच कार्यरत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एसआयडीकडे फडणवीस यांच्या सुरक्षेसंदर्भात काही माहिती (इनपुट) प्राप्त झाली आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.