पुणे : राज्यात काही भागात उन्हाचा चटका असून काही ठिकाणी हलका पाऊस, तर काही भागात गारठा वाढला आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. त्यानंतर हवामान कोरडे राहणार असून थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे.
राज्यात लवकरच थंडीला सुरुवात होणार असून काही भागात याची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागातील किमान तापमानात वाढ झाली आहे. तर, काही भागात कमाल तापमान वाढले आहे. शुक्रवारी (दि. १) राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान डहाणू येथे ३५.९ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे १७.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे.
हवामान विभागाने २ व ३ नोंव्हेंबरदरम्यान कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नगिरी, धाराशिव, लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर, राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप राहणार आहे. ४ ते ९ नोव्हेंबरदरम्यान हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.