मुंबई : शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईच्या नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शायना एनसी यांच्या तक्रारीवरून अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना शायना एनसींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवी मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप करत ऑडिओ क्लिप ऐकवली. अरविंद सावंत यांनी मला माल म्हणून संबोधलं असा आरोप शायना एनसी यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले अरविंद सावंत?
‘इथं इम्पोर्टेड माल चालत नाही, आमच्याकडे ओरिजनल माल चालतो. ओरिजनल माल अमिन पटेल आहे.’ असं अरविंद सावंत म्हणाले होते. अरविंद सावंत हे अमिन पटेल यांच्या प्रचारावेळी बोलत होते. आता त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला असून महाविकास आघाडीवर महायुतीकडून चौफेर टीका केली जात आहे.
शब्दात शायना यांची टीका…
यातून अरविंद सावंत यांची आणि त्यांच्या पक्षाची मनस्थिती यातून दिसते. त्यांची विचारधारा दिसते. एका महिलेला माल म्हणून संबोधतात. मुंबादेवीतील प्रत्येक महिला ही माल आहे का? ज्यांनी तुमच्यासाठी प्रचार केला त्यांच्यासाठी तुम्ही हे बोलत आहात. मोदींचं नाव लावून जिंकून आलेले मला माल म्हणतायत अशा शब्दात शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांना सुनावलं आहे.
थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सवाल करताना शायना एनसी म्हणाल्या की, उद्धव ठाकरे, शरद पवार गप्प का आहेत. संजय राऊत का बोलत नाहीत. एका महिलेचा सन्मान करू शकत नाहीत? तिच्यासाठी माल शब्द वापरता यातून तुमची मनस्थिती दिसून येते. महिलेला एक माल म्हणून बघत असाल तर महाराष्ट्रातील महिला तुम्हाला कधीच मदत करणार नाही. तुम्ही महिलांना माल म्हणालात तर तुमचे हाल होणार असंही शायना एनसी यांनी म्हटलं.