मुंबई : यूपीआय आधारित डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाल्याने डेबिट कार्डवर आधारित व्यवहारांमध्ये घट झाल्याचे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. डेबिट कार्ड आधारित व्यवहार या वर्षी ऑगस्टमध्ये सुमारे ४३,३५० कोटी रुपयांवरून ८ टक्क्यांनी घसरून सप्टेंबरमध्ये सुमारे ३९,९२० कोटी रुपयांवर आल्याचे या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.
दुसरीकडे, देशात क्रेडिट कार्डचे व्यवहार वाढले आहेत. ऑगस्टमधील १.६८ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत या वर्षी सप्टेंबरमध्ये क्रेडिट कार्ड आधारित व्यवहार जवळपास ५ टक्क्यांनी वाढून १.७६ लाख कोटी रुपये झाले आहेत. क्रेडिट कार्डवरील खर्चात झालेली वाढ ही मागील वर्षीचा कमी बेस आणि सणासुदीच्या हंगामामुळे सणासुदीच्या काळात समान मासिक हप्त्यांसारख्या जाहिरात योजना मोठ्या प्रमाणावर आल्याने हा परिणाम झाल्याचे बाजारातील जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या चलन व्यवस्थापन विभागातील अर्थतज्ज्ञ प्रदीप भुयान यांच्या दस्तऐवजानुसार देशातील डिजिटल व्यवहार इतक्या प्रमाणात वाढले आहेत की, रोखीचा वापर या वर्षीच्या मार्चपर्यंत ग्राहकांच्या खर्चाच्या ६० टक्के असून तो वेगाने कमी होत आहे. त्याचवेळी डिजिटल रक्कम व्यवहाराचे प्रमाण मार्च २०२१ मधील १४ ते १९ टक्क्यांवरून या वर्षीच्या मार्चमध्ये ४० ते ४८ टक्क्यांवर गेला आहे. यामध्ये यूपीआय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
देशात २०१६ सुरू झालेल्या यूपीआयने गेल्या पाच वर्षांत रिटेल डिजिटल पेमेंट्स व्हॉल्युममध्ये सर्वाधिक वाटा उचलला आहे. यूपीआय आधारित व्यवहाराचे प्रमाण या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ५२ टक्के वाढून ७८.९७ अब्ज झाले. मागील वर्षी याच कालावधीत ५१.९ अब्ज व्यवहार झाले होते.