पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते माजी उपमहापौर वसंत उर्फ आबा बागूल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढील अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला मिळावा, यासाठी आबा बागूल यांनी काँग्रेसचे नेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती.
पर्वती हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, अशी आग्रही मागणी केली होती. मात्र, ऐनवेळी शरद पवार यांनी पर्वतीतून स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आबा बागूल नाराज झाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान, अर्ज माघारी घेण्याची मुदत ही ४ नोव्हेंबर आहे. त्या दिवशी दुपारनंतर पर्वतीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.