नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारू पिण्याच्या वादातून नागपूरमध्ये एकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत राणी दुर्गावतीनगर येथील हार्डवेअरच्या दुकानासमोर एका कामगाराची दोन आरोपी तरुणांनी भोसकून हत्या केली आहे. दारू पिण्याच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत व्यक्तीचे नाव अब्बू हमजा जलालुद्दीन शेख असे आहे. तो मूळचा बिहारमधील मकतुली गाव येथील रहिवासी होता, तर टेकानाका येथील मोहम्मद तौसिफ अन्सारी ऊर्फ नौशाद अब्दुल सत्तार अन्सारी आणि माजिद कादिर अन्सारी या आरोपींनी मिळून त्याची हत्या केली आहे. मागील सहा महिन्यांपासून अब्बू हमजा हा संगमनगर परिसरात असलेल्या हातमागावर काम करत असल्याची माहिती मिळत आहे.
पगार झाल्याने बुधवारी रात्री अब्बू हमजाने वाईन शॉपमध्ये जाऊन दारू विकत घेतली. यानंतर हार्डवेअरचे दुकान बंद झालं असल्याने त्या दुकानापाशी येऊन तो दारू प्यायला बसला होता. त्यानंतर थोडा वेळाने मोहम्मद तौसिफ आणि माजीद कादीर हे देखील त्याच दुकानासमोर दारु पिण्यासाठी बसण्याच्या उद्देशाने हार्डवेअरच्या दुकानासमोर आले. दोघांनी अब्बूला तेथून निघून जाण्यास सांगितले. पण त्याने तेथून उठण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी आणि अबू हमजा यांच्यातील वाद वाढून विकोपाला गेला.
दरम्यान, आरोपींनी चाकू काढून अब्बूच्या छातीवर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पाचपावली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी माजीद कादीरला अटक केली आहे. यासोबत पोलीस पुढील तपास करत आहेत.