पुणे : अंगणवाडीतील बालकांना वर्षातील ३०० दिवस पोषण आहार मिळावा यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन टप्प्यांत दिलेल्या सुट्टीला विरोध झाल्यानंतर हा निर्णय शासनाने मागे घेतला. आता अंगणवाडी सेविकांना व मदतनिसांना ४ नोव्हेंबरपर्यंत सात दिवस सलग दिवाळीची सुट्टी असणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ करत त्यांच्या कामाची वेळ दोन तासांनी वाढवली आहे.
अंगणवाडीतील बालकांना वर्षातील ३०० दिवस पोषण आहार मिळावा, यासाठी शासनाने अंगणवाडी सेविकांना ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर, तर मदतनीस यांना ८ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुट्टी मंजूर केल्याचा आदेश काढला होता. मात्र, याला अंगणवाडी सेविका व मदतनिसांकडून तीव्र विरोध झाला. तसे पत्र संघटनेने एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त यांना पाठवले. त्यानंतर शासनाने हा आदेश मागे घेत ४ नोव्हेंबरपर्यंत सात दिवस सलग दिवाळीची सुट्टी जाहीर केली.
दरम्यान, शासनाने या महिन्यापासून अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे मानधन वाढवले आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन १० हजारांवरून १३ व सेवाज्येष्ठता वाढ, मदतनिसांचे मानधन ५ हजारांवरून ७५०० व सेवाज्येष्ठता वाढ असे करण्यात आले आहे. मात्र, त्याचबरोबरीने त्यांच्या वेळेत २ तासांनी वाढ केली आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी त्यांची वेळ असेल. त्यातील दोन तास हे गृहभेटीचे असणार आहेत.