अहिल्यानगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदीदरम्यान, नगर-पुणे महामार्गावरील एका चारचाकी वाहनातून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई सुपा टोलनाक्याजवळ काल (दि. ३१) निवडणूक आयोगाचे अधिकारी, तपासणी पथक व सुपा पोलीस यांनी संयुक्तपणे केली. या कारवाईत तब्बल २३ कोटी ७१ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, हे दागिने संभाजीनगरमधील एका सराफ व्यावसायिकाचे आहेत. ही गाडी पुण्यावरुन अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे जात असल्याचे गाडीतील व्यक्तींनी सांगितले आहे. या गाडीमध्ये तीन व्यक्ती होत्या. सुरूवातीला त्यांच्या जवळील बिलावरुन गाडीमध्ये ४ कोटी ९७ लाख रुपयांचे सोने व चांदीचे दागिने असल्याचे सांगण्यात आले. मात्र, निवडणूक अधिकारी, सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, आयकर अधिकारी यांनी पंचांसमक्ष पंचनामा केला असता गाडीमध्ये जास्तीचे बिले व सोने आढळून आले.
यामुळे पोलीस, आयकर व निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या देखरेखीखाली मोजमाप केले. यामध्ये सोन्याचे तयार दागिने, सोन्याची बिस्किटे, चांदीच्या विटा व डायमंड आढळून आले. गाडीसोबत दाखवलेली बिले व प्रत्यक्ष असलेला माल यात मोठी तफावत आढळून आली आहे. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.