आयपीएल 2025 स्पर्धेची चर्चा सुरु झाली आहे. कारण रिटेन्शन यादी जाहीर झाली असून भविष्याच्या नियोजनाच्या दृष्टीकोनातून खेळाडू रिटेन करण्यात आले आहेत. असं असताना सर्वांचं लक्ष लागून होत ते म्हणजे लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीकडे. लखनौ सुपर जायंट्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करते आणि कोणाला रिलीज याबाबतची उत्सुकता लागून होती. गेले काही दिवस झाले केएल राहुल फ्रेंचायझीसोबत खेळण्यास उत्सुक नसल्याची चर्चा रंगली होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं असून लखनौकडून तीन वर्षे कर्णधारपद भूषविलेल्या केएल राहुलला रिलीज करण्यात आलं आहे. अजूनही लखनौकडे राईट टू मॅचचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र असं असलं तरी लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. एका अर्थी त्यांनी केएल राहुलवर अप्रत्यक्षरित्या टीकाच केल्याचं बोललं जात आहे.
नेमकं काय म्हणाले संजीव गोयंका..
‘आम्हाला जिंकणाऱ्या मानसिकतेचे खेळाडू रिटेन करायचे होते. वैयक्तिक आकांक्षापेक्षा संघाच्या विजयाचं हीत जोपासतील.’ अशी प्रतिक्रिया संजीव गोयंका यांनी दिल्यांचं काही मिडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं असून त्यामुळे संजीव गोयंका यांनी अप्रत्यक्षरित्या केएल राहुलवर निशाणा साधलीच बोललं जात आहे. गेल्या पर्वात संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्यात भर मैदानात वाद झाला होता. तेव्हापासून केएल राहुल नाराज होता, असं सांगण्यात येत आहे. मध्यंतरी रिटेन्शनबाबत बैठकही पार पडली. पण केएल राहुलने फ्रेंचायझीसोबत खेळण्यास नकार दिल्याची चर्चा रंगली. आता हा वाद आणखी चिघळणार असं दिसत आहे.
लखनौ सुपर जायंट्सने निकोलस पूरनवर विश्वास टाकला आहे. त्याला 21 कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. त्यामुळे कर्णधारपदाची माळ त्याच्याच गळ्यात पडणार असं चित्र आहे. दुसरीकडे, रवी बिश्नोईला 11 कोटी, मयंक यादवला 11 कोटी, मोहसिन खानला 4 कोटी आणि आयुष बदोनीला 4 कोटी रुपये दिले आहेत. आतापर्यंत लखनौ 120 कोटी रुपयातील एकूण 51 कोटी खर्च केले असून 69 कोटी शिल्लक आहेत.