अकोला : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विविध राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच मनसेमध्ये बंडखोरांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. अकोल्यामध्ये मनसेच्या उपाध्यक्षानेच आपल्या जिल्हाध्यक्षाचं कार्यालय फोडल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसे महिला जिल्हा अध्यक्ष प्रशंसा अंबेरे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. मनसे महानगर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर यांनीच ही तोडफोड केली असल्याची माहिती समोर येत आहे. कार्यालयातील फर्निचरच्या साहित्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. तोडफोडीचे कारण अस्पष्ट आहे. मनसे सैनिक तक्रार करण्यासाठी जुनेशहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उमेदवारी अर्ज छाननी होऊन बाद उमेदवारांची नावे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, अकोला जिल्ह्यात मनसेच्या उमेदवाराचाच अर्ज बाद झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली असून, आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही संबंधित उमेदवारावर करण्यात आला आहे. त्यातून, त्यांच्या मनसे कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अकोल्यातील डाबकी रोड भागातल्या आठवडी बाजार चौकात अंबेरे यांचं कार्यालय आहे. अंबेरे यांनी विरोधी उमेदवारांशी हातमिळवणी करून जाणीवपूर्वक आपलं वय कमी असल्याची बाब लपवल्याचा आरोप आता मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून ही तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे. उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या प्रकारात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे. या घटनेनंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.