सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर विहिरीचे कुशल कामाचे १ लाख ५ हजार ८५६ रुपये बिलाची फाईल दाखल करून मंजूर करण्यासाठी ६ हजाराची लाच मागणाऱ्या तांत्रिक अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. बुधवारी (दि.३०) सिल्लोड पंचायत समितीमध्ये ही कारवाई करण्यात आली. महेश गजानन देवगिरीकर (३५) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदार यांच्या आईच्या नावावर असलेल्या शेतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर विहिरीचे काम करण्यात आले होते. या कुशल कामाच्या बिलाची १ लाख ५ हजार रुपयांची बिलाची फाईल मंजूर करण्याचे काम आरोपी महेश गजानन देवगिरीकर (३५) याच्याकडे होते. या कामासाठी देवगिरीकर याने ६ हजार रुपयांची लाच मागितली होती.
याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. पथकाने या तक्रारीची पडताळणी करीत सापळा रचून महेश देवगिरीकर याला ताब्यात घेतले. त्याच्यावर सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधिक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, चैनसिंग घुसिंगे, युवराज हिवाळे, चालक देवसिंग ठाकूर आदींनी केली.