नाशिक : महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून सुरू असलेला तिढा उमेदवार मागे घेण्याच्या तारखेपर्यंत सुटण्याची चिन्हे आहेत. नाशिकमध्येही महाविकास आघाडीमध्ये झालेली बंडखोरी शमणार असल्याचे चित्र आहे. असे असले तरी नाशिक मध्यच्या बंडखोर उमेदवार डॉ. हेमलता पाटील यांनी मात्र आपण अपक्ष लढणारच असा पवित्रा घेत थेट पक्ष नेत्यांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी राज्यभर काही मतदारसंघात एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. त्याचा तिढा सुटणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून अथवा काँग्रेसच्या नेत्यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले अर्ज मागे घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष बंडखोरी झालेल्या काही जागांवर माघार घेण्याच्या तयारीत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले असून तसे आवाहन राज्याचे पक्ष निरीक्षक चेन्नीथला यांनी केले आहे.
महाविकास आघाडीत नाशिक मध्य मतदार संघातून काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, हनीफ बशीर शेख, गुलजार कोकणी, इगतपुरीत शिवसेना ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दखल केले आहेत. याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.