संतोष पवार
मुंबई : राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक घेण्यात येणार आहे. या दिवशी सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच कोणत्याही मतदाराला मतदानापासून वंचित राहावे लागू नये, याकरिता मतदानादिवशी पगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत .
विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. खासगी आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुटी द्यावी, सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदानापुरती सूट द्यावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
राज्यातील सर्वच जिल्ह्यात केंद्र, राज्य आणि निमसरकारी कार्यालये, बँका, महामंडळे, कटक मंडळे (कॅन्टोन्मेंट बोर्ड), विद्यापीठे, शिक्षण संस्था, औद्याोगिक आस्थापना मोठ्या प्रमाणात आहे. उद्याोगधंद्यांच्या अनुषंगाने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्थलांतरितांचे प्रमाण आहे. खासगी कंपन्यांसह माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील मतदारांची संख्या मोठी आहे.
मतदानाच्या दिवशी राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुटी देणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व आस्थापनांनी मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुटी द्यावी. सुटी देणे शक्य नसल्यास कामाचे ठिकाण आणि संबंधित कर्मचाऱ्याचे मतदान केंद्र हे अंतर लक्षात घेऊन मतदानासाठी सूट द्यावी. विशेष म्हणजे सुटी किंवा ठराविक अवधी दिला असल्यास वेतनात कपात करू नये, असेही शासनाने नमूद केले आहे .दरम्यान, मतदारांकडून मतदानाकरिता सुटी अथवा सवलत दिली गेली नसल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनेविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.