भुसावळ (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भुसावळमधील द्वारकानगर परिसरात कौटुंबिक वादावरून एका विवाहित महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे.यानंतर संशयित पती अक्षय आप्पासाहेब गुंजाळ फरार झाला होता. रेल्वेने प्रवास करीत असताना रेल्वे सुरक्षा बलाने शिताफीने त्याला मनमाड रेल्वेस्थानकावरून संशयितास आठ तासांत ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वर्षा गुंजाळ असे मृत महिलेचे नाव आहे. मुंबईत वास्तव्यास असताना पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाल्याने विवाहिता वर्षा गुंजाळ चार महिन्यांपासून भुसावळच्या आजी रंजना प्रकाश यशोदे यांच्यासोबत राहत होती. दोन दिवसांपासून अक्षय मुंबईवरून पत्नी वर्षाला मुंबई घेऊन जाण्यासाठी भुसावळात नातेवाइकांकडे आला होता. राग सोडून मुंबईला चल, असा तो हट्ट करीत होता. मात्र, वर्षाने नकार दिल्याने अक्षयचा राग विकोपाला गेला. आजी दुपारी चारच्या सुमारास बाजार करण्यासाठी गेली होती. त्याचा फायदा घेत संशयित अक्षय गुंजाळ याने वर्षा गुंजाळच्या डोक्यात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये वर्षाचा मृत्यू झाला.
आजी घरी आली असता घटना उघडकीस आली. याबाबत शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा बल विभागाचे रिजर्व अधिकारी आर. के. सिंग व निरीक्षक पी. आर. मीना यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ तांत्रिक विश्लेषणांच्या आधारे संशयिताचा शोध घेतला असता तो मनमाड येथे असल्याची माहिती मिळाली. मनमाड रेल्वे सुरक्षा बल विभागाचे उपनिरीक्षक दीपक गायकवाड यांनी रेल्वे स्थानकावर शोध घेत रात्री अकराच्या सुमारास संशयित अक्षय गुंजाळ रेल्वेस्थानकावर झोपलेला दिसून आला. त्यास तत्काळ ताब्यात घेण्यात आले.