गोरख जाधव
डोर्लेवाडी, (पुणे) : डोर्लेवाडी व परिसरात दोन ते तीन दिवसांपासून सकाळी आणि रात्री वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. पहाटे सर्वत्र गारवा पसरून धुके पडत आहे. गुलाबी थंडीची चाहुल लागल्याने आल्हाददायक वातावरणाचा नागरिक मनसोक्त आनंद घेत आहेत.
सकाळी व दुपारी कडक ऊन तर संध्याकाळी पाऊस अशा सततच्या वातावरणातील बदलामुळे विविध प्रकारच्या साथीच्या संसर्गाने आधीच नागरिक हैराण झालेले आहेत. असे असताना सोमवारी मात्र सकाळ सकाळीच घराबाहेर पडलेल्यांना पसरलेल्या दाट धुक्याच्या सुखद आनंदाचे एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले.
डोर्लेवाडी मध्ये पडलेले धुके इतके दाट होते की सकाळच्या वेळेत काही विशिष्ट अंतरावरील दृश्य अगदीच पुसट दिसत होते. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण होऊन बसले होते. त्यामुळे रस्त्याने कामानिमित्त मार्गस्थ होणाऱ्या तसेच आलेल्या लोकांना आपल्या वाहनांचे दिवे लावूनच रस्ता पार करावा लागत होता.
या वर्षी सर्वत्रच पाऊसाने जोरदार बारसात केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाऊसामुळे शेतीची नासाडी तर काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे शेतातील पिके जगली आहेत. आशाताच पाऊस-ऊन यामुळे पिकांवर चांगलाच परिणाम झाला आहे. त्याचबरोबर या गुलाबी थंडीने अचानक महाराष्ट्रामध्ये जोरदार एंट्री केली आहे.
दरम्यान, मागील चार दिवसांपासून चांगलीच थंडीची लाट येऊ लागली आहे. आता मात्र सोमवारपासून बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावामध्ये दाट धुक्यांची चादर सर्वत्र पसरलेली लोकांना पाहिला मिळाली. मॉर्निगऑक साठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पसरलेल्या या दाट धुक्यांचा मनमुराद आनंद घेता आला. डोर्लेवाडी परिसरात धुके पडू लागल्याने अखेर हिवाळा सुरु झाल्याची चाहूल लागली आहे.