–सागर जगदाळे
भिगवण : भिगवण पोलीस पथकाने महाराष्ट्रात बंदी असलेला आठ लाख रुपयांचा सुगंधी पान मसाला व गुटखा मुद्देमालासह जप्त केला आहे. भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे.
याप्रकरणी भाऊसो किसन सकुंडे, (वय. 27 वर्ष, रा. मदनवाडी,ता. इंदापुर, जि.पुणे) याला अटक करून ताब्यात घेतले आहे.
भिगवण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भिगवण-राशीन राज्यमार्गावर डिकसळ (ता.इंदापूर) गावच्या हद्दीत बसस्थानकासमोर भिगवण पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत होती. त्यादरम्यान बुधवारी (दि.30) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना संशयास्पद वाटणाऱ्या भिगवणकडून राशीनकडे निघालेल्या मारूती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची सियाज गाडी(एम.एच.45/एन.5626)ची तपासणी करण्यात आली.
त्यावेळी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखु व सुपारी असणारी गुटखा हा पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमधून घेऊन जात असल्याचे निर्देशनास आले. त्यादरम्यान, अधिक तपास केला असता पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये अवैध पान मसाला आणि गुटखा जवळ बाळगुन वाहतुक करीत असताना दिसून आला. यानंतर भिगवण पोलिसांनी त्याच्याकडून गुटखा आणि गाडी असा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहे.