पुणे : परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यात आता थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्रात तापामानात घट झाल्याने सकाळच्या हवेत गारवा जाणवू लागला आहे. धुक्यासह दव पडत असल्याचेही चित्र दिसत आहे. तसेच आजही राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
पावसाळा संपला तरी देखील राज्यात पावसाने विश्रांती घेतली नाही. नवरात्रोस्तव संपून आता दिवाळी सण सुरु झाला तरी देखील राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. दिवळी सणावर पावसाचे सावट असल्यामुळे पावसामध्ये दिवाळी साजरी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.