दिवाळी सणानिमित्त घरात फराळ करणं हे स्वाभाविकच आहे. या सणाच्या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जातात आणि या काळात ते विविध प्रकारच्या भेटवस्तू आणि मिठाई आणतात. अशावेळी दिवाळीत अनेक प्रकारच्या मिठाई घरोघरी उपलब्ध असतात. मात्र, या मिठाईंमध्ये सोन पापडी ही अशी मिठाई आहे जी दरवर्षी प्रत्येकाच्या घरी पोहोचते.
सोनपापडी खायलाही चांगली वाटते. त्यात तुमच्या घरात भरपूर सोनपापडी उरली असेल, तर आज आम्ही तुम्हाला उरलेली सोनपापडी वापरण्याची एक उत्तम पद्धत सांगणार आहोत. जी बनवायला सोपी आणि खायला खूप चविष्ट असेल. त्यासाठी काही साहित्याचीही गरज पडणार त्याची माहिती आम्ही देणार आहोत.
– सोन पापडी – 500 ग्रॅम, फुल क्रीम दूध – 1 लिटर, चिरलेले काजू – काही, चिरलेले बदाम – काही, चिरलेला पिस्ता – काही, वेलची पावडर- अर्धा टीस्पून, तूप – एक चमचा, साखर – चवीनुसार हे साहित्य अत्यावश्यक आहे.
बनवण्याची पद्धत काय?
– सोनपापडी खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यात 1 चमचा तूप टाका आणि थोडे गरम झाल्यावर त्यात सर्व ड्रायफ्रुट्स टाका आणि हलके तळून घ्या. ड्रायफ्रूट्स हलके भाजल्यानंतर ते वेगळे काढा. नंतर या कढईत 1 लिटर दूध टाका आणि त्यात ठेचलेली सोन पापडी घाला.
– दुधात सोनपापडी टाकल्यावर नीट ढवळून घ्या आणि नंतर त्यात अर्धा चमचा वेलची पूड घाला. थोडा वेळ शिजल्यावर त्यात साखर घालून ढवळा. साखर घालताना लक्षात ठेवा की सोन पापडी आधीच गोड आहे, त्यामुळे जास्त साखर घालू नका. त्यात काही ड्रायफ्रुट्स टाकून शिजू द्या.
– खीर थोडी घट्ट झाली की गॅस बंद करा. तुमची सोन पापडी खीर तयार आहे. एका भांड्यात घाला आणि उरलेल्या ड्रायफ्रुट्सने सजवा.