भिवंडी : तरुणीने शेजाऱ्यास प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने चाकूने तरुणीची निघृण हत्या केली. बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या लहान बहिणीवरही वार करून गंभीर जखमी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना भादवड गावातील कानिफनाथ मंदिराजवळील कृष्णानगर मधील शत्रुघ्न तरे चाळीत घडली आहे. याप्रकरणी खून करणाऱ्या आरोपीच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर तो फरार झाला आहे.
नितू भान सिंग (२३) असे मृत झालेल्या पीडित तरुणीचे नाव आहे. तर राजू महेंद्र सिंग (२४) असे हत्या करणाऱ्या आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून मृत तरुणी देखील उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यातील असून सद्यस्थितीत कुटुंबासोबत येथील भादवड गावातील कृष्णानगर मधील भरत तरे यांच्या चाळीतील एका भाड्याच्या खोलीत राहत होती. आरोपीही मृत तरुणीच्या शेजारी राहत आहे. दरम्यान तरुणीने शेजाऱ्याला प्रेमसंबंधास नकार दिला होता. याच रागातून २८ ऑक्टोबर रोजी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास राजूने नितू घरी एकटी असताना भाजी कापण्याच्या चाकूने तिच्या शरीरावर वार करून तिची निघृण हत्या केली.