पंढरपूर: पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे घरगुती वादातून मित्रानेच आपल्या मित्राचा चिडून जाऊन चाकूने भोसकून खून केल्याची घटना सोमवार २८ ऑक्टोबर रोजी घडली. मित्राने जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर दोघात कडाक्याचे भांडणं झाले, यात चाकूने मारहाण करत मित्राचा खून केल्याने खळबळ उडाली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मयत सिद्धेश्वर मछिंद्र पवार (वय ३९, रा. देवकाते मळा, टाकळी रोड) हा आपला मित्र औदुंबर गाढवे यांच्या घरासमोर सोमवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास गेला असता त्या ठिकाणी मयत सिद्धेश्वर पवार व आरोपी औदुंबर गाढवे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यावेळी या बाचाबाचीमध्ये घरगुती कारण असल्याने जाब विचारताना भांडणात रूपांतर होऊन आरोपीने पवारवर चाकूने हल्ला केला. या हल्यात सिद्धेश्वर पवार हा मयत झाला. याप्रकरणी मयताच्या पत्नीने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेत आरोपीच्या शोधासाठी पथक तयार करून रवाना केले. हत्येनंतर काही तासातच आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा पुढील तपास वडणे हे करीत आहेत.