सौरभ सुतार
निरा नरशिंहपुर : इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुणांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जीवावर केंद्र व राज्य सेवेतील अधिकारी पदाच्या परीक्षेत यश संपादन करुन मजल मारत तालूक्याचे नावलौकिक केल्याचे प्रतिपादन श्रीराज दत्तात्रय भरणे यांनी केले.
पिंपरी बुद्रुक ( ता. इंदापूर ) येथील योगेश शिवाजी गायकवाड यांनी “राज्य कर निरीक्षक” पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागेश गायकवाड, दादाभाई शेख, दत्तात्रय शेंडगे, प्रशांत बोडके, युवराज गायकवाड, आलताफ शेख, प्रशांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीराज दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशाचा वाढता टक्का पाहून तरूणांमध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न वाढीस लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे तरूणांनी मन एकाग्र चित्ताने अभ्यासावर लक्ष देवून मोठ्यात मोठे अधिकारी होण्याचा मान पटकवावा. सेवेत भर्ती झालेल्या तरुणांनी भविष्यात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे शेवटी त्यांनी सांगितले.