पुणे : ६०० ग्रॅम वजनाच्या, २६ आठवड्यांच्या बाळाला वाचविण्यात यश आले. रेस्पीरेट्री सिंड्रोम, प्रीमॅच्युर असल्याने अशक्तपणा, ऑस्टियोपेनिया, रेटिनोपॅथी आणि कावीळ यांसारख्या विविध गुंतागुंतींसह जवळजवळ ७० दिवसांच्या नवजात अतिदक्षता विभागातील यशस्वी संघर्षानंतर आता हे बाळ सुखरूप घरी परतले आहे. ही किमया पुण्यातील डॉक्टरांनी करून दाखविली.
पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमधील नवजात शिशू व बालरोगतज्ज्ञ डॉ. उमेश वैद्य यांच्या नेतृत्वाखालील आणि डॉ. सिद्धार्थ मदभुशी, डॉ. अनुषा राव यांच्या पथकाने यशस्वी उपचार केले. ३२ वर्षीय सुजाता नायर (नाव बदलले आहे) तिच्या पहिल्या बाळाच्या स्वागताची आतुरतेने वाट पाहत असताना तिचे मन आनंदाने भरून गेले होते. १५ जुलै रोजी अकाली प्रसूतिकळा आल्याने तिला प्रसूतीसाठी पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
याबाबत डॉ. उमेश वैद्य यांनी सांगितले की, आईची प्रकृती स्थिर होती, पण तिला मुदतपूर्व प्रसूतिकळा आल्याने १५ जुलै रोजी नैसर्गिक प्रसूती करण्यात आली. तिने ६०० ग्रॅम वजनाच्या २६ आठवड्यांच्या बाळाला जन्म दिला. मायक्रो-प्रीमी म्हणजेच २६ आठवड्यापेक्षा कमी कालावधीत जन्मलेले बाळ आणि ज्याचे वजन हे ७५० ग्रॅम पेक्षा कमी असते. अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रगत सुविधा आणि कौशल्यामुळे अकाली जन्मलेल्या बाळांचे जगण्याचे प्रमाण वाढले आहे.