मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हल्लेखोरानं फोन करुन दोन कोटी रुपयांची मागणी केली असून पैसे न मिळाल्यास सलमानला मारण्यात येईल असं म्हटलं आहे
मुंबई पोलीसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एक फोन आला. त्यावेळी 2 कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास सलमान खानची हत्या करण्यात येईल, अशी धमकी फोन करणा-या व्यक्तीने दिली आहे. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात 354 (2),308 (4) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
यापूर्वी सलमान खान आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा आमदार मुलगा झीशान सिद्दीकी यांना एक फोन आला होता, यावर देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील 20 वर्षीय तरुणला अटक देखील केली आहे. दरम्यान, सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.