अयनुद्दीन सोलंकी/घाटंजी (यवतमाळ) : काँग्रेसचे अधिकृत उमेदवार व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र शिवाजीराव मोघे यांनी शक्ती प्रदर्शन करुन निवडणूक निर्णय अधिकारी (80) सुहास गाडे यांच्याकडे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी भाजपाचे अधिकृत उमेदवार राजू तोडसाम यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला होता.
काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र मोघे यांनी अगोदर पांढरकवडा शहरातून मोटार सायकल रॅली काढली. या वेळी पांढरकवडा शहरात रॅलीने लक्ष वेधून घेतले होते. आर्णी विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 26 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात भाजपचे उमेदवार राजू तोडसाम व काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र मोघे यांचा समावेश आहे.
रॅलीत काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र मोघे यांच्यासह माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, शिवसेनेचे माजी आमदार (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) बाळासाहेब मुनगीनवार, विदर्भ जन आंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव मेश्राम, माजी आमदार ख्वाजा बेग, आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी नगराध्यक्ष अनिल आडे आदी रॅलीत सहभागी झाले होते. या वेळी आर्णी, घाटंजी व पांढरकवडा आर्णी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पांढरकवडा येथील माउली सेलिब्रेशन हाॅल मध्ये सभा पार पडली. यावेळी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र मोघे यांना भरघोस मंतानी निवडून देण्याचे आवाहन प्रमुख व्यक्त्यांनी केले. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे यांचा भाजपाचे उमेदवार राजू तोडसाम यांनी पराभव केला होता, हे येथे उल्लेखनीय. दरम्यान, आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राजू तोडसाम व काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र मोघे यांच्यात अटीतटीची लढत होईल, असा राजकीय अंदाज वर्तविण्यात येत आहे.