पुणे : पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मद्यधुंद कार चालकाची भरधाव वेगातील कार कर्तव्यावर जात असलेल्या महिला सहायक पोलीस आयुक्तांच्या वाहनाला धडकल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क येथील महात्मा गांधी चौकात घडली आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई मनोजकुमार तुकाराम सोने यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रफुल्ल भरत वाडे (वय- ३२. रा. विश्रांतवाडी) याच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस आयुक्त (खडकी) अनुजा देशमाने आणि त्यांचे दोन कर्मचारी येरवड्याहून खडकीच्या दिशेने त्यांच्या वाहनातून जात होते. त्यावेळी बंड गार्डन पुल परिसरात अपघात झाला आहे. असे पोलिसांनी सांगितले की, कार चालक मद्यधुंद अवस्थेत त्याची कार चालवत होता.
दरम्यान, नशेत असलेल्या कारचालकाने ब्रेक लावला नाही. त्याने पाठीमागून पोलिसांच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर त्याने पोलिसांसोबतच हुज्जत घातली. तो एका खासगी कंपनीमध्ये काम करतो. या कारचालकाकडे वाहन परवाना नसल्याचे आढळले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तर पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार आव्हाळे करीत आहेत.