नाशिक : विधानसभा निवडणुकीत शहरातील चारही मतदारसंघांमधील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार असून, बहुतांश राजकीय पक्षांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यापैकी कितीजण विधानसभेचा सोपान चढतात याचे औत्सुक्य असले तरी पहिल्याच प्रयत्नात उमेदवारीची संधी मिळाल्यानेही अनेकांची तर ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’, अशी मनोवस्था झाली आहे.
निवडणूक जाहीर होण्याच्या जवळपास वर्षभर आधीपासून ‘भावी आमदार’ बिरुदावली लावत कार्य अहवाल तयार करून पक्षश्रेष्ठींच्या मुलाखतीची तयारी देखील करून ठेवली होती. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच इच्छुकांच्या आकांक्षांना धुमारे फुटले. मिळेल त्या ठिकाणी स्वतःची छबी टाकून आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे दाखवून देत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला गेला, अनेकांना पहिल्यांदाच संधी मिळाल्याने त्यांनी आमदार होण्यासाठी दंड थोपटले आहेत. अर्थात, यात काही अपक्ष उमेदवारांचा देखील समावेश आहे. नवीन चेहऱ्यांमध्ये नाशिक शहरातील चारही मतदारसंघांतून रंजन ठाकरे, दिनकर पाटील, करण गायकर, शशिकांत जाधव, मनीषा जाधव, अविनाश शिंदे, गणेश गिते, जगदीश गोडसे, प्रसाद सानप, अंकुश पवार यांचा समावेश आहे. यातील अनेक उमेदवारांसमोर विद्यमान आमदारांचे आव्हान आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणच्या लढती देखील तेवढ्याच रंजक होणार असल्याने या लढतींकडे लक्ष लागून आहे.
आजी माजी आमदारांमध्ये लढती
नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व आणि देवळाली या शहरातील चार मतदारसंघांत अनुक्रमे देवयानी फरांदे, सीमा हिरे, अॅड. राहुल ढिकले व सरोज अहिरे या विद्यमान आमदारांना संधी मिळाली आहे. योगेश घोलप, वसंत गिते हे माजी आमदारही निवडणूक रिंगणात असल्याने नवीन चेहरे, तसेच आजी-माजी आमदारांमध्ये होणाऱ्या लढती चर्चेचा विषय ठरल्या आहेत.