नवी दिल्ली: भारतीय ऑटोमोबाईल उद्योग सध्या सर्वात मोठ्या परिवर्तनातून जात आहे. ग्राहकांना पेट्रोल-डिझेलची वाहने किंवा इलेक्ट्रिक कार आता फारशी रुचत नाही. या दोन पयार्याव्यतिरिक्त ग्राहकांना आता काहीतरी नवीन हवे आहे. ग्राहक आता आपल्या कारसाठी लक्झरी आणि शाश्वत दोन्ही पर्याय शोधत आहेत. यामुळे भारतीय वाहन उद्योगात नव्या युगाची सुरुवात होत असल्याचे ग्रँट थॉर्नटन इंडियाने केलेल्या ‘शिफ्टिंग गियर्स: अंडरस्टैंडिंग पॅसेंजर व्हेईकल मार्केट ट्रेंड्स’ या सर्वेक्षणात म्हटले आहे.
जवळपास ८५ टक्के ग्राहक प्रीमियम मॉडेल्सचा विचार करत आहेत आणि इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा हायब्रिड वाहनांना प्राधान्य देत आहेत. या सर्वेक्षणात देशभरातील ३,५०० पेक्षा जास्त लोकांची मते जाणून घेण्यात आली. सर्वेक्षणामध्ये जवळपास ४० टक्के ग्राहक आता हायब्रिड वाहनांना प्राधान्य देत आहेत, तर केवळ १७ टक्के लोक ई-वाहनांच्या बाजूने आहेत. याउलट ३४ टक्के लोकांचा कल अजूनही पेट्रोल वाहनांकडे असल्याचे म्हटले आहे. हायब्रिड वाहनांसोबतच ग्राहक आता अधिक मजबूत ई-वाहन पायाभूत सुविधांचे पर्याय शोधत आहेत.
सणांच्या काळात ४० टक्के वाहनांची विक्री
सणासुदीचा हंगाम वार्षिक विक्रीत ३०-४० टक्के योगदान देतो आणि विशेषतः भारतीय वाहन उद्योगासाठी ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे कार कंपन्यांनीही या निमित्ताने विशेष तयारी करायला हवी. सणासुदीच्या काळात सवलती देण्याबरोबरच त्यांनी त्यांचे आवडते मॉडेल लॉन्च करून ग्राहकांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला पाहिजे, असे मत ग्रँट थॉर्नटन इंडियामधील भागीदार तसेच वाहन आणि ई-वाहन उद्योगाचे प्रमुख साकेत मेहरा यांनी व्यक्त केले.