-राहुलकुमार अवचट
यवत : दिवाळी सण सुरु झाला असून यवत बाजार पेठ विविध वस्तूंच्या खरेदीसाठी सजली आहे. दिव्यांची महती सांगणारा सण म्हणजे दिपावली. प्रत्येक घराच्या दारात दिवाळीला आकाश कंदील – दिवा लावला जातो यामुळे खरेदीसाठी यवत बाजारपेठेत विविध रंगाचे, विविध आकारांचे आकाश कंदील विक्रीला आले आहेत. विक्रेत्यांनी रंगीबेरंगी पणत्या, रांगोळी, आकाश कंदील, घरगुती सजावटीचे साहित्य विक्रीसाठी ठेवले आहेत. या सणाला दिव्यांचे विशेष महत्त्व असते. यामुळे बाजारात मातीचे, चिनी मातीचे, प्लास्टिकच्या पणत्या विक्रीसाठी आलेले आहेत. महिला, तरुणी यांची खरेदीसाठी तुरळक प्रमाणात गर्दी होत असून, वेगवेगळ्या आकाराच्या, रंगांचे आकाश कंदील खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.
वर्षभरातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात लगबग वाढू लागली असली तरी सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने बाजारपेठेत शांतता दिसून येत आहे. खरेदीसाठी महिलांमध्ये उत्साह दिसून येत आहे तर पुरुष मंडळी निवडणुकीत दंग असल्याचे चित्र यवत परिसरात पाहायला मिळाले. नोकरदारवर्गाची दिवाळी खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. महाराष्ट्रात वर्षभरात साजरे केले जाणाऱ्या विविध सणांपैकी दीपावली या सणाबाबत आबालवृद्धांपासून सर्वांनाच विशेष आकर्षण असते. पाच दिवसांच्या या सणामध्ये प्रत्येक दिवसाचे एक वेगळे दिनविशेष असल्याने प्रत्येक दिवसासाठी लागणाऱ्या विविध स्वरूपातील वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठेत हळूहळू गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची आपल्या दुकानाला पहिली पसंती मिळावी, यासाठी दुकानदारांनीही आपापली दुकाने विविध प्रकारे सजवून ठेवली आहेत, तर किराणा सामान, फटाक्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फुलवाल्यांची दुकाने, कपड्याची दुकाने, मिठाईची दुकाने, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने आदी दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. यावेळी बाजारपेठेत असलेले आकाश कंदील लक्ष वेधत असून दिवाळी सणासाठी बाजारपेठ बहरली आहे. प्रकाशाचा झगमगाट करणारे आकाश कंदील, दिवे, पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्या असून विविध डिझाइन, आकारांतील आकाशकंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, कागदांच्या वाढत्या किंमतीमुळे यंदा आकाशकंदील देखील महागले आहेत.
दीपोत्सवासाठी रंगीबेरंगी कागदी, कापडी आणि प्लास्टिकचे आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. विविध आकाश कंदिलाच्या उपलब्धतेमुळे बाजाराला बहर आला आहे. तर चांदणी कंदील खातोय भाव असे चित्र पाहण्यासाठी मिळत आहे, पारंपरिक आणि काही नव्या प्रकारातील आकर्षक आकाश कंदिलांनी बाजारपेठा सजल्या आहेत. चांदणी, पेशवाई, टोमॅटो बॉल, पॅराशूट याबरोबरच कापडी बांबू पासून बनवलेले असे इको फ्रेंडली आकाशकंदील यंदा बाजारात उपलब्ध झाले आहेत.
कागदी, प्लास्टिक, पीव्हीसी, मेटॅलिक, मोती तसेच फुलांचे तोरण, टिकाऊ फुलाची माळ, आकर्षक मेणाचे विविध प्रकारचे दिवे, लायटिंग पणत्यांनी दुकाने सजली आहे. बाजारपेठेत गर्दी दिसली दिसत असली तरी दिवाळी आणि निवडणूक एकाच वेळी आल्याने नेहमीपेक्षा मागणी कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले
ग्रामपंचायतने केलेले नियोजनाचे यवतकरांकडून कौतुक
दिवाळी म्हटली की फटाकड्याची मोठ्या प्रमाणात आदेश बाजी होत असते. परंतु यंदा निवडणूक आणि दिवाळी एकाच वेळी आल्याने अनेकांनी दिवाळी ऐवजी निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी फटाकडे वाजवण्याचे नियोजन केलेले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर यंदा फटाक्यांच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या किंमतीतही काही प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे लहान मुलांसह फटाके फोडणाऱ्यांना देखील चिंता सतावत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून यवत ग्रामपंचायतीने सर्व फटाका दुकाने बाजार मैदानात एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली असल्याने नागरिकांना याची फार मोठी सोय निर्माण झाली आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात फटाकड्यांची दुकाने थाटली जातात, अनेक ठिकाणी महामार्गावर, लोकवस्तीत, विजेच्या तारांच्या खाली धोकादायक ठिकाणी दुकाने थाटली जातात परंतु यवत परिसरात मागील काही वर्षांपासून फटाके दुकानदारांना इतरत्र कोठेही दुकाने न लावता फक्त बाजारतळावरच दुकाने लावावीत असा नियम ग्रामपंचायतने घालून दिला असून. यामुळे यवत परिसरातील व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडून यवत ग्रामपंचायतचे कौतुक होत आहे.
आज दिवाळी सुरू झाली असली तरी अपवाद वगळता फटाके दुकाने सजली नसल्याने फटाके खरेदी करण्यासाठी यवतकरांना उद्या पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.