-राहुलकुमार अवचट
यवत : संपूर्ण पुणे जिल्ह्यात महत्त्वाचा असलेल्या दौंड विधानसभा निवडणुकीनिमित्त दौंड चे विद्यमान आमदार व महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत तहसील कार्यालयातउमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर, योगेश टिळेकर, प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल, भाजपा पुणे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे उपस्थित होते.
दौंड तालुक्यातील चारही बाजूने कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते एकत्र येत दौंड शहरामध्ये छ. शाहू महाराज स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवाजी चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गेल्या 65 वर्षापासून कुटुंबीय हे जनतेची सेवा करत असून दौंड तालुक्यातील जनतेने साथ दिल्याबद्दल तर स्वर्गीय आमदार सुभाष कुल यांच्या अचानक जाण्याने गेल्या 24 वर्षांपासून आपण माझ्यासारख्या तरुणाच्या हातात सत्ता दिल्याने आभार व्यक्त करत सभेला संबंधित केले. समोर काहीच नसताना आपलीच मते त्यांना पडतात ही सल कायम असायची परंतु आजची गर्दी पाहून ती देखील दूर झाल्याचे राहुल कुल यांनी सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.
गेल्या दहा वर्षांपासून समाजासाठी सातत्यपूर्ण कामे केली असून गेल्या अडीच वर्षात सक्षमपणे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनेक योजना सक्षम राबविले आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठीच विचार चालू असतो. 24 वर्षापासून सर्व जाती बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. इतरांवर टीका करण्याऐवजी सतत सकारात्मक कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीच्या यादीत दौंड तालुक्यातील उमेदवाराचे नाव नव्हते ऐनवेळी एबी फॉर्म देण्याची वेळ महाविकास आघाडीवर आली.
गेल्या दहा वर्षात तालुक्यातील केलेल्या विकास कामाची माहिती देत शहरातील अनेक कामे केली असून काही अपूर्ण आहेत. ही कामे देखील लवकरच पूर्ण केले जातील. येणाऱ्या पाच वर्षात पुढील पन्नास वर्षात तालुक्याला पाणी कमी पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दहा वर्षात सातत्यपूर्ण कामे केलेली असून यापुढे महाराष्ट्रात दौंड तालुका अग्रगण्य म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असून दहा वर्षात कोणत्याही दुजाभाव केला नाही म्हणूनच मतदारांनी देखील जातपात न पाहता मतदान करा, असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले.
यावेळी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची हवा होती. परंतु तीही कमी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसची शेवटची निवडणूक आहे तर काँग्रेस ही इंग्रजांची पार्टी असून काँग्रेसमध्ये फक्त प्रस्थापितांनाच स्थान आहे, अशी टीका गोपीनाथ पडळकर यांनी केली.
राहुल कुल हे ओबीसी व धनगर समाजाच्या प्रश्नासाठी कायम बरोबर असतात म्हणून आपण देखील ठामपणे राहुल कुल यांच्या पाठीशी रहा, असे आवाहन पडळकर यांनी केले. यावेळी योगेश टिळेकर, प्रेमसुख कटारिया, वासुदेव काळे, नंदू पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता पार्टी यांसह महायुतीतील पक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुल कुल हे गेल्या 24 वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, गेल्या दहा वर्षांपासून आमदार असल्याने मतदारसंघात उत्तम पकड आहे. मागील दोन्ही निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांचा पराभव केला असून आता तिसऱ्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. यावेळी देखील माजी आमदार रमेश थोरात यांच्यासोबत सामना होणार आहे. विद्यमान व माजी आमदार असा हा सामना दौंडमध्ये होणार असून यावेळी कोण बाजी मारणार हेदेखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.