पिंपरी (पुणे) : खोली पाहण्यासाठी आलेल्यांना शिवी दिल्याने भाडेकरूला टोळक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने भाडेकरूचा मृत्यू झाला. याप्रकरणी रविवारी (दि. २७) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, हरी गणपत वाघमोडे (वय ३३), अविनाश रमेश गव्हाळे (वय २८), विपुल सुरेश कुंभार (वय २७, सर्व रा. थेरगाव), संदीप कांतीलाल शेंडगे (रा. दत्त मंदिर रोड, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश अर्जुन देडगे असे खून झालेल्या भाडेकरूचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सतीश देडगे हा हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साळुंखेवस्ती येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. ही खोली खाली होणार असल्याने २२ ऑक्टोबर रोजी घरमालकाचा मित्र आकाश हेडगे हा इतर आरोपींसह खोली पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी भाडेकरू देडगे हा रूममध्ये दारू पिऊन झोपला होता. आरोपींनी त्याला उठवले असता त्याने शिवीगाळ करण्यात सुरुवात केली. आम्ही खोली बघण्यासाठी आलो आहे, असे सांगितल्यानंतरही देडगे हा त्यांना मारहाण करण्यासाठी धावला. त्यानंतर त्यांच्यामध्ये मारामारी सुरू झाली. दरम्यान, आरोपींनी संगनमत करून देडगे याला लाकडी प्लायच्या पट्टीने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने देडगे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.